किल्ले राजगड स्थळदर्शन ट्रेक
८ - ९ फेब्रुवारी २०२०
काही वर्षांपूर्वी गुरुवर्य अप्पा परब यांचे किल्ले राजगड स्थळ दर्शन हे पुस्तक हाती लागलं अगदी तेव्हापासून राजगडाला भेट देऊन, नेहमीच्या ट्रेक रुटीनला फाटा देऊन फक्त आणि फक्त किल्ला बघण्यातच संपूर्ण वेळ घालवावा अशी इच्छा झाली होती. यावेळी फेब्रुवारी २०२० ला पाऊलचा राजगड ट्रेक ठरला आणि २० जण करता करता शेवटी फक्त ६ जण उरलो आणि अनायसेच एक जबरा फक्त स्थळदर्शन ट्रेक करायचा योग आला.
ट्रेक सदस्य :६:- सचिन, अमर ,नरेंद्र, मी धवल , अमिता, आणि मंगेश उर्फ राजू,
|
छायाचित्र 1 संपूर्ण ग्रुप
|
आमचं ठरलेलं की राजगडाचा राजमार्ग म्हणजेच पाली दरवाजा मार्गाने गड जवळ करायचा. मात्र आंतरजालावर मिळालेल्या माहितीनुसार याभागात सार्वजनिक वाहतुकीची जरा वानवाच आहे. त्यामुळे गडाखालच्या गावातल्या संतोष भोसलेंना संपर्क करून त्यांचीच गाडी पाली दरवाज्याकडील भोसलेवाडी पर्यंत ठरवून घेतलेली. संतोष दादांचा नंबर शोधून काढण्याचे पूर्ण श्रेय आमचा रिसोर्स मॅनेजर :-P सचिन कडेच जात. सचिन असला की आम्हाला असल्या गोष्टींची चिंता करायची गरजच उरत नाही :-D. हा अर्ध्या पाऊण तासाचा प्रवास आहे.
भोसलेवाडीतून मोठी मळलेली वाट पूर्ण गडापर्यंत जाते त्यामुळे वाटेत चुकण्याचा संभव नाही. पुन्हा एकदा चहाचं इंधन पोटात टाकलं आणि मस्त फोटो काढत, भूगोल बघत निघालो गडाकडे.
मजल दरमजल करत रस्त्यात ताकाच्या बाटल्या रिचवत, पाली दरवाजा पर्यंतचा उभा चढ चढलोसुद्धा. दरम्यान रस्त्यात खंडोबाच्या माळावरून एक वाट जिजाऊ माता सृष्टी अशी पाटी वागवतांना दिसली. फक्त एक किलोमीटर म्हणून तिकडेही जाऊन आलो. काही वर्षांपूर्वीच तिथे एक गोशाळा व जिजाऊंची सुंदर मूर्ति स्थापिली आहे. तिचे दर्शन घेऊन पुन्हा मूळ वाटेला लागलो.
संपूर्ण वाट मुद्दामहून वळणावळणांची ठेवली आहे, कारण पूर्ण वाटेवर समोरून दोन्ही बाजूंनी पद्मावती व संजीवनी माचीच्या बुरुजांवरून नजर ठेवता येते. वळणावळणांच्या वाटेवरून शत्रूला वर चढून यायला वेळ लागतो आणि तो पूर्ण वेळ बुरुजा-तटांवरच्या तिरंदाज, बंदूकधारी, गोफणी तसेच हुक्के म्हणजेच रॉकेट यांच्या माऱ्यात राहतो.
करता करता भोसलेवाडीतून दिड तासात गडाच्या काही संरक्षित तर काही पुनर्बांधित पायऱ्यांपाशी येऊन पोचलो. राजगडावर सरकारतर्फे संरक्षण आणि पुनर्बांधणीचं काम वेगाने चालू आहे. पुनर्बांधणीच्या कच्च्या सामानावरून होणाऱ्या तसेच इतर काही वादांना बाजूला ठेवल्यास पूर्ण झालेल्या काही वास्तू आतून आणि खासकरून बाहेरून पर्यटक दृष्टीने पाहायला खूपच सुंदर आणि ऐतिहासिक वाटतात. अतिसूक्ष्म पातळीवर जाऊन केलेल्या इतिहास आणि भूगोलाच्या अवलोकनावरून जर पुनर्बांधणी काम झाल्यास याहून चांगले काहीच नाही.
तर येथून थोड्या पायऱ्या चढून जाताच अतिशय उत्तमरीत्या संरक्षित पाली म्यान दरवाजा अचानक एका डाव्या वळणावर समोरा येतो. गडावर असलेल्या असंख्य वास्तूंपैकी हि पहिली. अतिविस्ताराच्या भयापोटी येथून पुढे काय काय जागा शोधत आम्ही फिरलो ती यादी अगदी थोड्या माहितीसोबत जोडतो.
पद्मावती माची
छायाचित्र 2
पाली म्यान दरवाजा
१. पाली म्यान दरवाजा :- कोणतेही शुभ शिल्प किंवा दैवत शिल्प या दरवाजावर दिसत नाही. मजबूत, अगदी बेचक्यात असा शुद्ध लढाऊ दरवाजा.
२. गोमखी मार्ग :- दरवाजातून पुढे गोमुखी रस्ता पूर्णपणे जंग्या आणि चर्यांच्या माऱ्यात येतो.
३. म्यान दरवाजावरील सज्जा :- हुकाच्या आकाराचा रस्ता वर येताच बरोब्बर पाली दरवाजाच्या समोर एक छोटासा दरवाजा म्यान दरवाजाच्या गच्ची वर घेऊन जातो. येथून म्यान दरवाजाला भिडू पाहणाऱ्या शत्रूवर उकळते तेल आणि लाकडी जळते ओंडके टाकत.
४. रिक्त खोरण :- पाली महादरवाजाच्या डाव्या बुरुजाखाली एक रिक्त खोरण आहे. जिथे रक्षणकर्त्या मारुतीरायाची मूर्ती होती जी सध्या पद्मावती माचीवरच्या महादेव मंदिरात आहे.
५. पाली महादरवाजा :- गडाचा मोठा व विस्तृत असा राजदरवाजा, याच दरवाजातून महाराज, महाराज्ञी, राजमाता, युवराज, युवराज्ञी यांच्या पालख्या गडावर आणि गडाखाली आल्या गेल्या. मोठ्या मोहिमांवर निघतांना शूर सरदार आणि मावळे याच दरवाजाने गड उतरले. मोहीम फत्ते करून आल्यावर महाराज आणि सरदार यांची ओवाळणी याच दरवाजाने पाहिली.
|
छायाचित्र 3 पाली महा
दरवाजा
|
|
छायाचित्र 4 दौलतबंकी सदर
|
७. देवड्या:- कर्तव्यावर असलेल्या पहारेकऱ्यांच्या औटघटकेच्या आरामासाठी तसेच जेवणखावण करण्यासाठी देवड्या ठेवलेल्या असतात. पाली दरवाजातून आत येताच डाव्या हाताला देवड्या दिसतात.
८. बालेकिल्ला खासमार्ग :- महादरवाजाच्या चुनेगच्चीवर येताच दौलतबंकी सदरेच्या वरच्या बाजूने बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या स्पष्ट पायऱ्या दिसतात. या पायऱ्या एके काळी थेट बालेकिल्ल्याच्या उत्तरबुरजावरून सुरु होऊन पाली दरवाजा वरून सरळ राजसदरे कडे जात. मात्र या पायऱ्या आज संजीवनी माची परवानगी दरवाजा पर्यंतच जातात. एकेकाळी संपूर्ण पायऱ्यांचा असलेला हा मार्ग राजपरिवाराच्या खासगीतला होता आणि येथून फक्त राजे, युवराज, अष्टराज्ञी, राजमाता आणि त्यांच्या दासी यांचाच वावर असे.
|
छायाचित्र 5 राणीवसा तलाव
|
११. सदरेखालील तळघर:- तटसरनौबत निवाडा करेपर्यंत किंवा मोठ्या न्यायालयात हजेरी लावेपर्यंत कच्च्या कैद्यांना याच तळघरात डांबून ठेवीत.
१२. तटसरनौबत घर:- या वास्तूला हमरस्त्याच्या बाजूने दरवाजा व खिडक्या नसल्याने कदाचित दारुगोळा कोठार समजले जाते पण पूर्वेकडून दरवाजा आहे. तसेच ही वास्तू गडाच्या अगदी हमरस्त्यावर आहे समोरच सदर आणि अंबरखाना आहे तसेच पद्मावती माचीवरील अति महत्वाच्या अधिकाऱ्यांची घरे इथून फार दुर नाहीत अश्या परिस्थितीत ही वास्तू दारुगोळा कोठार असणे संयुक्तिक वाटत नाही. त्याऐवजी ही वास्तू म्हणजे तटसरनौबताचे घर असावी (फक्त एक अंदाज).
१३. अंबरखाना :-तटसरनौबत घराच्या बरोब्बर समोर लहान लहान खोल्यांचा अंबरखाना आहे. अंबरखान्याच्या ओसरीला असलेल्या शिवकालीन लोखंडी कड्या बघून लोक याला घोड्याची पागा समजतात. मात्र राजगडावर जागा कमी असल्याने कधीच घोडे आणले जात नसत त्यामुळे घोड्यांच्या पागेची गरजच नव्हती. या कड्या पावसाळ्यात कनातीसाठी बांबू अडकवण्याच्या कामी येत असत.
१४. कारकून फडाची जागा
१५. श्री महादेव मंदिर:- राजगडावरील वास्तव्यावेळी महाराज नित्यनेमाने या मंदिरात दर्शनास्तव येत असत.
१६. छप्पर टाके १७. महादेव टाके :- या दोन्ही टाक्यांचे पाणी पिण्यालायक शुद्ध आहे.
१८. पद्मावती मंदिर :- गडाच्या बालेकिल्ल्यावरील ब्रम्हर्षी मंदिरासोबतच स्थापित केली गेलेली गडाची पुरातन देवता, सर्वच काळात ही गडाची सर्वांत व्यस्त जागा होती. सध्या मंदिरात देवीचा पुरातन तांदळा आहे. तसेच शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली मूर्ती आहे आणि भोर संस्थानकाळात तत्कालीन भोरच्या राजाने स्थापन केलेली मूर्ती गाभाऱ्यात आहे.
१९. मंदिराच्या उत्तरेकडच्या टाक्या:- यातील एक टाकी मंदिराच्या कमी वापरली जाई. एक टाकी मंदिराच्या खालचा कातळ कोरून बनवली आहे.
|
छायाचित्र 6 पद्मावती तलाव,
बंधारा आणि सभोवतालची तटबंदी
|
|
छायाचित्र 7 सात आसरा
देवी
|
२१. सात आसरा :- तलावाच्या पश्चिम बाजूला एका कातळावर सात शेंदूर टिळे लावल्यासारखे दिसतात त्या सात आसरा देवी आहेत. प्रचलित मान्यतेनुसार पाणवठ्याकिनारी असणाऱ्या मच्छी (मासा), कुर्मी (कासव), कर्कटी (खेकडा), दुर्दुरी (बेडूक), मकरी (मगर), जतुपी (चतुर) आणि सोमपा (पाकोळी) या त्या देवता.
२२. पद्मावती माची खासगी द्वार :- प्रचलित चोर / गुप्त द्वार या नावाने ओळखला जाणारा हा दरवाजा गुप्त तर बिकूलच नाही आहे. माचीवर स्पष्टपणे दिसणारे हे द्वार आहे. हा चोर दरवाजाही नाही कारण चोर दरवाजा हा अतिदुर्गम असतो तसेच साधारणपणे अश्या ठिकाणी असतो की जिथुन येणारा जाणारा कोणाच्या नजरेत येणार नाही. मात्र सांप्रत हा ट्रेकर्सचा सर्वांत नेहमीचा वापराचा दरवाजा आहे आणि त्याचप्रमाणे सध्या निसर्गाच्या माऱ्याने जरी झिजल्या असल्या तरी कातळकोरीव पायऱ्यांची वाट आहे ही त्यामुळे चोर दरवाजा नक्कीच नाही. हे अधिक संयुक्तिक वाटते की या दरवाजाने पद्मावती माचीवर रोजच्या जीवनात लागणारे सर्व सामान खालच्या गावांतून आणण्यासाठी सर्व-सामान्य
रयतेच्या रोजच्या वापरातील हा दरवाजा असावा.
२३. तटातील शेतखाने :- संपूर्ण गडावर तटबंदीत भरपूर संख्येत स्वच्छतागृह बांधलेली दिसतात त्यांनाच शेतखाने, पायखाने, तारतखाने वगैरे नावं आहेत.
|
छायाचित्र 8 शेतखाने
|
२५. सोनोपंत डबीर वाडा :- सध्या पर्यटक निवास या नावाने ओळखला आणि वापरला जाणारा हा वाडा राजांचे वकील सोनोपंत डबीर यांचे राहते घर होते.
छायाचित्र 9 सईबाई वा सोनोपंत डबीर समाधी
२७. त्रिपुर स्तंभ:- पद्मावती मंदिर समोरील हा स्तंभ दीपमाळ नाही, तर याच्यावर त्रिपुरारी पौर्णिमेला कर्पुरोत्सवात कापूर जाळून ज्योत करण्यासाठी वाडगा सदृश बनावट आहे.
२८. राजवाडा व दिवाण-इ-आम :- कारकून फडाच्या मागच्या बाजूला जिजाऊंचा राहता वाडा तसेच शिवरायांची राजसदर होती.
बालेकिल्ला
|
|
१. बालेकिल्ला अतिदक्षता द्वार:- बालेकिल्ला चढतांना बालेकिल्ला महाद्वाराआधी दोन अजून दरवाजे येतात. त्यांतला हा दुसरा दरवाजा, या दरवाजातून फक्त शिवरायांच्या खासगीतील तसेच फक्त विश्वासू वर बालेकिल्ल्याकडे जाऊ शकत असत, तेही पूर्णतया विनाशस्त्र.
२. बालेकिल्ला महाद्वार:- या दारातून शिवराय तसेच अतिमहत्त्वाचे शासकीय, लष्करी अधिकारी यांची येजा चाले. तसेच याच द्वाराच्या कोनाड्यात अफजलखानाचे शीर पुरले आहे असेही म्हटले जाते.
|
छायाचित्र 11 बालेकिल्ला महाद्वार
|
३. श्री जननी मंदिर
|
छायाचित्र 12 चंद्रकोर तळे
|
४. चंद्रकोर तळे:- चंद्रकोरीच्या आकाराचे सुंदर पिण्यायोग्य पाण्याचे तळे.
५. ब्रम्हर्षी मंदिर व पाण्याची टाकी:- गडाचे आद्य दैवत. अज्ञात कालखंडात ब्रह्मर्षि उपासकाने या डोंगरावर ब्रह्मर्षि तसेच पद्मावती मंदिर स्थापित केले आणि येथेच ब्रम्हाची उपासना चालू केली. त्यामुळेच या डोंगराला ब्रह्मदेवाचा डोंगर, बिरमदेवाचा किंवा मुरुंबदेवाचा डोंगर अश्या संज्ञा पडल्या. मंदिराच्या मागच्या बाजूला काही टाकी आहेत त्यातील एक कोरून ब्रह्मर्षि मंदिराच्या खाली पर्यंत नेलेले आहे. चंद्रकोर तळे पकडून मंदिराच्या मागे पुढे सात पाण्याची टाकी आहेत.
|
छायाचित्र 13 बालेकिल्ला उत्तर
बुरुज
|
८. उत्तर बुरुज खासगत मार्ग:- आता पूर्णपणे ढासळलेला मात्र शिवकालीन पायऱ्यांचा हा मार्ग बालेकिल्ल्यातून सरळ पाली दरवाजाजवळुन पद्मावती माचीवरील राजसदरेवर जात असे. याचा वापर फक्त शिवरायांच्या कुटुंबाकडुन केला जात असे. उत्तर बुरुजाच्या डाव्या तटात या मार्गाचा बुटकासा दरवाजा आहे.
९. अष्टराज्ञी निवास:- उत्तर बुरुजापासून निघून उत्तर पश्चिम तटबंदीसोबत चालत जातांना काही मोठ्या पण अज्ञात वास्तूंचे मोठे चौथरे, जोती दिसतात. बालेकिल्ल्याच्या पश्चिमेकडील बुरुजाजवळ राण्यांची निवासस्थाने होती. समोरच दासी निवासस्थाने होती. या पश्चिम बुरुजावरून संजीवनी माचीचे उत्तम दर्शन होते. याच बुरुजा वरील तोफांनी संजीवनी माची संरक्षित होती.
१०. स्वयंपाकगृह:- बालेकिल्ल्याच्या अत्युच्च जागेवर शिवराय आणि कुटुंबासाठीचे स्वयंपाकगृह आहे. यातही दोन दालने आहेत. दक्षिणेकडील दालनात एकापेक्षा अधिक दगडी चुली आजही दिसतात.
११. राजांचे शयनगृह:- पूर्वेकडे स्वयंपाकगृहाला लागूनच शिवरायांचे शयनगृह आहे.
|
छायाचित्र 14 शिवरायांचे निवासस्थान
|
१३. दिवाण-इ-खास:- या इमारतीने अनेक मोहीमा बनतांना ऐकल्या आहेत, अनेक महत्वाच्या भेटीगाठी याच इमारतीच्या साक्षीने झाल्या आहेत. याच इमारतीत महाराजांनी अष्टप्रधानांसोबत अनेक बैठका घेतल्या.
१४. खजिनागृह उर्फ रत्नशाळा :- अनवधानाने या इमारतीला दारुकोठार म्हणतात, मात्र खाश्या महाराजांच्या महालाच्या इतक्या जवळ दारुकोठार कसे काय बनवले जाईल ? तर हे खजिनागृह असावे कारण १९८६ साली झालेल्या उत्खननात येथे चांदीची जाळीदार झाकणी सापडल्याचे उल्लेख मिळतात.
|
|
बालेकिल्ला मनसोक्त भटकून परत पद्मावती माचीवर पोचल्यावर जरा आराम करत पहुडायची इच्छा तर फारच होती मात्र आमचं लक्ष्य ठरलेलं होतं सूर्यास्त संजीवनी माचीवरच. त्यामुळे फक्त एक फक्कड चहा घेऊन आम्ही मोर्चा लगेचच संजीवन माचीकडे वळवला. संजीवन माची म्हणजेच दणकट चिलखती बुरुज व जबरदस्त तटबंदी आणि सूर्यदेवाने निजावयाला निघतांना केलेली गुलाबी, नारिंगी, पिवळ्या रंगांची विलक्षण सुंदर रांगोळी या दोन्ही नजाऱ्यांचा मिलाफ.
या माचीवर जातांना तसेच येतांना बघितलेल्या वास्तू;
१. तटसरनौबत सदर
२. शिबंदीची घरे
३. पहिला झुंझार बुरुज:- या बुरुजावरून संपूर्ण संजीवन माचीचे दर्शन घडते आणि शिवकाळात संजीवन माचीवरून गडावर येऊ घातलेला शत्रु इथल्या ताकदवान तोफांच्या पूर्णपणे माऱ्यात येत असे.
|
|
५. सटवाई टाके:- संजीवन माचीवरचे सर्वांत मोठे टाके.
६. दुसरा झुंझार बुरुज:- या बुरुजावरून माचीच्या चिलखती तटबंदीचे सुरेख दर्शन घडते.
छायाचित्र 16 दुसऱ्या झुंझार बुरुजावरून संजीवन माची
छायाचित्र 17 आळ दरवाजा
शाहामृग शिल्प
|
|
|
संजीवन माची आणि सूर्यास्ताचे दर्शन करून आजचा दिवस शेवट करण्यासाठी पुन्हा पद्मावती माचीवर आलो व अख्ख्या माचीवर चर्चेचा विषय ठरलेला आमचा १० लोकांची निजायची सोय करणारा भला मोठ्ठा तंबू ठोकून, जेवण उरकुन निजलो. रात्रभर धुसमुसळेपणाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तंबू इतका वाकत होता की झोप तशी भरपेट झालीच नाही. तसा आमचा प्लॅन पहाटे उठून सुवेळा माचीवरून सूर्योदय बघायचाच होता, पण पहाटे गडाभोवती गोळा झालेल्या धुक्याच्या चादरीला पाहून आम्ही पण आमच्या चादरी पुन्हा अंगाभोवती गोळा करून घेतल्या.
छायाचित्र 21 गडावरचा चर्चेचा विषय आमचा तंबू
|
छायाचित्र 22 झुंझार बुरुजाच्या
टप्प्यातील सुवेळा माची
|
सुवेळा माची
सकाळी उठून, तंबू गुंढाळून, मस्तपैकी चहा मारून सरळ बॅगा पॅक करून त्या घेऊनच तब्बल ९ वाजता आम्ही सुवेळा माची कडे कूच केलं.
१. मारुती:- सुवेळा माचीकडे जातांना डुब्याच्या (टेकाडाच्या) शेवटी मारुती शिल्प.
२. हजारियांचे घर:- शिवकाळात राखीव फौजेच्या वतनदाराला हजारी म्हणत. डुब्याच्या पूर्व उतारानंतर येणाऱ्या सपाटीवर अगदीच सुरवातीला महाराजांच्या विश्वासु हजारियांची, म्हणजेच येसाजी कंक, संताजी शिलिंबकर, तानाजी मालुसरे अश्यांची घरे होती. या घरांची जोती बघता येतात. यांची मूळ घरे आणि कुटुंब कबिला त्यांच्या मूळ गावांत होते, त्यामुळे गडावर यांची घरे लहानच दिसतात.
३. सुवेळा माची तटसरनौबत सदर
४. झुंझार बुरुज :- दूरवर टेहळणी तसेच तोफांचा मारा करण्यासाठी हा भला मोठा बुरुज उभारला गेला होता. ह्यावरून दूरपर्यंत पसरलेली सुवेळा माची फारच मोहक वाटते.
छायाचित्र 24 झुंझार बुरुज
सुवेळा माचीवरून
|
छायाचित्र 23 संताजी शिलिमकरांची घुमटी
|
५. वीरगळ घुमटी:- या झुंझार बुरुजावर एका बाजूला एक घुमटी दिसते. वीरांचे स्मरण करण्यासाठी अशी घुमटी बांधून त्यात दिवाबत्ती केली जात असे. शिवकाळात व नंतरही सुवेळा माचीचे तटसरनौबत होते संताजी शिलिंबकर. डिसेंबर १७०३ मध्ये औरंगजेबाशी झुंजताना शिलिंबकरांनी सुवेळा माची बिनी बुरुजावर तोफेचा गोळा छातीवर झेलला होता. या नरवीराच्या स्मृतीत ही घुमटी बनवली आहे.
६. सुवेळा माची दरवाजा व तटबंदीतील गणेश:- बुरुजाच्या बाजूने पूढे माचीकडे जाण्यासाठी एकमेव असलेला हा दरवाजा पार करावा लागतो. दरवाजातून उतरताच उजव्याबाजूला तटात एक सुंदर शेंदुरधारी गणेश मूर्ती आहे. मूर्ती शिवकालीन अथवा पेशवेकालीन आहे. एका कथेनुसार शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीचे भूमिपूजन याच गणेशाच्या स्थापनेने आणि पूजेने केलेले.
७. उजवीकडील आपत्कालीन द्वार :- या द्वारातून पुढे फक्त एक माणूस बाहेर पडण्याइतकीच जमीन आहे, त्यापुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास सरळ पाताळगमनच.
८. नेढे:- नैसर्गिक आश्चर्य. १५ ते २० लोक सहज मावतील इतके मोठे नेढे किंवा डोंगराला आरपार भोक. शिवकालीन याचा काही वापर केला जात असेल तर ते अभ्यासनीय आहे.
९. डाव्या तटबंदीतील गुंजवणेकडील
सुवेळामाची द्वार:- गुप्तद्वार जे गुंजवणे गावाकडे दाट जंगलातील वाटेने घेऊन जाते.
१०. चुन्यासाठी हौद:- गडाच्या डागडुजीसाठी वारंवार लागणाऱ्या चुन्यासाठी साठा करण्यासाठी बांधलेले गोल / चौकोनी हौद.
११. चिलखती तटबंदी:- संजीवनी माचीप्रमाणेच सुवेळामाचीची तटबंदीही चिलखती आहे.
१२. बिनीचा बुरुज आणि मारुती शिल्प:- माचीच्या टोकाला असलेल्या या बुरुजाने जोरदार लढाया बघितल्या, स्वराज्यावर जीव ओवाळून टाकणारे वीरही बघितले. या बुरुजाच्या चिलखतात रात्रीच्या वेळेला पहारेकऱ्यांना धीर देणारे मारुती शिल्पही आहे.
काळेश्वरी परिसर
सुवेळा माची मनभरून बघितल्यावर आम्ही मोर्चा वळवला काळेश्वरी बुरुजाकडे. साधारणपणे सुवेळाकडे येणारे १ टक्का ही “पर्यटक” (हो पर्यटकचं ते) काळेश्वरी परिसरात येत नाहीत. शिवकालीन, यादवकालीन पासून ते अगदी अज्ञात कालखंडापासूनच्या वास्तू या भागात दिसतात. ही गडाची सर्वांत जुनी बाजु मात्र शिवकाळातही आणि आजही तशी निर्जनच. सुवेळाच्या झुंझार बुरुजासमोरूनच काळेश्वरी कडे जाणारा खालच्या काळेश्वरी बुरुजाच्या टप्प्यातला मार्ग आम्ही पकडला.
१. पाण्याच्या टाक्या (तीन खांबी पाणी टाके) :- येथे चार पाणी टाकी बाजू बाजूला आहेत. त्यातलं पहिलं मोठं टाकं पूर्णपणे कोरडे पडले आहे. पुढच्या तीनपैकीमधलं टाकं खांबयुक्त आहे. हे तीन खांब यादवकालीन बांधकामाची साक्ष देतात. तीनही टाकी सध्या पिण्यायोग्य स्वच्छ पाण्याने भरलेली आहेत.
|
छायाचित्र 25 काळेश्वरी बुरुज
आणि द्वार
|
४. समाधी :- अप्पांच्या अभ्यासानुसार हि समाधी शिवाजी महाराजांनी शहाजी राजांच्या मृत्यूनंतर येथे उभारली असावी. समाधी एक वृंदावन आणि त्यावर शिवपिंडीच्या रूपात आहे. सध्या या वृंदावनासमोर नवीनच मात्र छानसा आणि रेखिव असा दगडी नंदी ठेवलेला आहे.
छायाचित्र 26 काळेश्वरी बुरुजावरील समाधी
५. अज्ञात दरवाजा:- काळेश्वरी बुरुजाकडून थोडंसच पुढे गेल्यावर एक सुंदरपणे बांधलेला दोन द्वारांचा, गोमुखी रचना असलेला दरवाजा दिसतो. मात्र या दरवाजाबद्दल कोणतीही माहिती किंवा त्याचे नावही मिळत नाही.
छायाचित्र 27 रामेश्वर मंदिर
|
|
छायाचित्र 30 भागीरथी तीर्थ टाकं |
८. ब्रम्हर्षि शिष्य मूर्ती व टाकं:- भागीरथी तीर्थ टाक्याच्या बाहेरून, दक्षिण बाजूला, भागीरथी टाक्याच्या कातळकोरीव भिंतीला लागूनच अजून एक छोटं टाकं आहे व याच्याच अंगच्या भिंतीवर ब्रह्मर्षि शिष्याची जटाधारी, पद्मासनस्थ, डावा हात मांडीवर ठेवलेल्या रूपात मूळ खडकात उठावदार खोदलेली मूर्ती आहे. हिचे मुख मात्र भंगलेलं आहे. |
छायाचित्र 31 ब्रम्हर्षि शिष्य
मूर्ती
|
|
छायाचित्र 32 दगडी दोणी
|
दगडी दोणी बघून पुन्हा एकदा सुवेळामाची सदरेजवळ आलो. आता आमचा रोख आम्ही वळवला गडाच्या गुंजवणे दरवाजा कडे, कारण आता हा दरवाजा बघून सरळ येथुनच खाली उतरायचे होते. सदरेपासून पटापट चालत १५ मिनिटांतच आम्ही गुंजवणे दरवाजाकडे उतरायला सुरवातही केली. सुरवातीलाच उजवीकडे मोठे पाण्याचे टाके दिसते, पाणी मात्र पिण्यालायक नाही दिसले. येथुन पुढे दरवाजापर्यंतचा तसेच त्यानंतरही खाली जाण्याचा रस्ता निसर्गाच्या माऱ्यामुळे बराच दुर्लाघ्य झाला आहे, मात्र आता आधारासाठी योग्य ठिकाणी आणि मजबूत रेलिंग लावल्याने हा मार्ग बऱ्यापैकी वापरात आला आहे. गुंजवणे द्वार हे गडाच्या सर्वांत जुन्या द्वारांपैकी एक होय. हा दरवाजा यादवकालीन असल्याचे इतिहास सांगतो.
छायाचित्र 33 कड्यावरचा अवघड
गुंजवणे दरवाजा
|
छायाचित्र 35 सिंहशिल्प
|
छायाचित्र 34 हेमाडपंथी बांधणीचे
गुंजवणे महाद्वार
|
२. गुंजवणे महाद्वार:- आतल्याबाजूने याची यादवकालीन हेमाडपंथी रचना म्हणजेच दगडावर दगड रचून केलेली रचना स्पष्टपणे दिसते.
३. महाद्वारावरील गजलक्ष्मी शिल्प:- आताशा बरेच पुसटसे झालेले पण थोड्या प्रयासाने दिसणारे यादवकालीन गजलक्ष्मी शिल्प महाद्वाराची पुनर्बांधणी न झाल्याची साक्ष देते. दोन्ही बाजुंना दोन हत्ती, सोंड वर उचललेली, मध्यभागी कमलकलिका रुपी माता लक्ष्मी असे हे शिल्प आहे. इतिहासानुसार या गजलक्ष्मी शिल्पाच्या द्वाराच्या उंबऱ्याखाली महाराजांना गुप्तधन सापडले होते ज्याचा वापर राजगडाच्या अद्वितीय बांधणीत केला गेला.
|
|
४. गुंजवणे म्यान दरवाजा:- हा शिवकालीन दरवाजा आहे. बाहेरील बाजूने हा खडक खोदून बनवलेला आहे.
गुंजवणे द्वारातून खाली जाणारा मार्ग एका तीव्र उताराच्या डोंगर सोंडेवरून गुंजवणे गावाकडे जातो. कोणे एके काळी हा या दिशेचा सर्वांत महत्वाचा मार्ग होता मात्र सध्या येथून फार कोणी फिरकत नाही. मात्र संपूर्ण घसाऱ्याच्या भागात मजबूत रेलिंग लावून हा मार्ग आता बऱ्यापैकी सुलाघ्य केला आहे. येथून फक्त दिड ते दोन तासांत आम्ही गावात पोहोचलो.
खाली गावात पोचुन कळाले कि ज्या ४.३० वाजेच्या बस साठी आम्ही आलेलो त्या बसचा रविवारी भरोसाच नसतो. थोडासा वेळ थांबलो चहा घेतला आणि आता पुढे काय करायचं याचा प्लॅन करतच होतो तेवढ्यात कळाले कि आमचे आदल्या दिवशीचे सारथी संतोषभाऊ गाडीसहित गावातच चौकात उभे आहेत. लगेच त्यांना गाठलं आणि नसरापूर पर्यंतचा प्रश्न सोडवला.
खरंतर असं वाटलेलं कि एकदा नसरापूरला आलो कि पुढे पुण्यापर्यंत जायला गाड्याच गाड्या. म्हणूनच नसरापूर फाट्याला चांगला तासभर जेवणाचा कार्यक्रम रंगवला. त्यानंतर मात्र पाय कामातून गेले असतांनाही तासभर रस्त्यावर थांबून, पळून दिसेल त्या गाडीला हात दाखवत होतो. शेवटी आलेल्या एका स्वारगेट एस. टी. च्या जवळपास समोर उडीच मारून तिला थांबवली, ड्रायव्हरला आणि प्रवाश्यांना रीक्वेस्टच करून आत प्रवेश मिळाला. तशाही परिस्थितीत एक दीड तास उभं राहून स्वारगेटला पोचलो आणि सरळ ठाणे साठी बस आहे का बघितली. नशिबाने बस लगेच होती नी पहिला नंबर लावून तिकीटही मिळवले. मुंबईवाले ५ मेंबर ठाणेकडे आणि कणकवली वाला मेंबर, राजू, कोल्हापूरकडे एकाच वेळी निघालो. नसरापूर पासून स्वारगेटला पोहोचेपर्यंत आराम तसा काहीच मिळाला नाही मात्र कधीतरी असाही अनुभव हवाच की. थोडा हिशोब थोडा आराम करत शेवटी ठाणे आणि तिकडून मध्यरात्री घरी पोहोचलो आणि एका जबरदस्त ट्रेकचा एंड केला. आणि अश्याप्रकारे राजगड स्थळदर्शन ट्रेक झाला सुफळ संपन्न.
लेखक -- धवल स. भंगाळे
पाऊल ट्रेकर्स
संदर्भसूची
१.
पुस्तक - किल्ले राजगड स्थळ दर्शन, संकलक: श्री. आप्पा परब, दुर्गसृष्टी प्रकाशन
-
छायाचित्र 18 आळ
दरवाजा शाहामृग शिल्प
३.
राजगड किल्ला भेटीदरम्यान घेतलेल्या स्वयं-नोंदी. ८-९ फेब्रुवारी २०२०.












