महाराष्ट्रातील प्राचीन मंदिराचे प्रकार आणि अंतरंग
** सुरवात **
जेव्हापासून बुद्धिमान माणूस पृथ्वीवर वावरायला लागला तेव्हापासूनच त्याने दृश्य-अदृश्य शक्तींना कधी भक्तिभावाने तर कधी भीतीभावाने पुजायला सुरवात केली. हळूहळू जशी बौद्धिक क्षमता वाढू लागली तशी त्याने अजून आणि अजून सुंदर मंदिरांची निर्मिती सुरु केली.
पहिलं मंदिर माणसाने कधी बनवलं असेल ? ह्या प्रश्नच उत्तर साधारणपणे आपण देऊ इ.स.पूर्व ५००-६०० ला तरी असेलच. पण इतिहास असं नाही म्हणत, सध्या असलेल्या माहिती नुसार त्या काळात मंदिरांची निर्मिती भारतीय उपखंडात तरी अजून झालीच नव्हती. आता अर्थातच आपण सध्या भारतातील प्रसिद्ध हिंदू मंदिरशैलींबद्दलच बोलतो आहोत. बाकी बौद्ध - जैन लेणी मंदिरे बऱ्याच आधी पासून बनणे सुरु झालेच होते. त्यांबद्दल पुन्हा कधीतरी बोलूया.
भारतीय उपखंडाच्या विचार केला तर वैदिक काळात म्हणजे साधारण पणे इ.स.पूर्व १५०० पर्यंतच्या काळात इंद्र, वरुण, अग्नी, वायू, भूमी अश्या देवतांची उपासना ही यज्ञांद्वारे केली जाई. यज्ञाच्या अग्नीत अर्पण केलेले नैवद्य आवाहन केल्या जाणाऱ्या दैवतेपर्यंत पोहोचते अशी मान्यता होती.
वैदिक काळानंतर येणारा महत्वाचा कालखंड म्हणजे नंद राजघराण्याचा काळ इ.स.पूर्व ५०० ते ३५०. या काळात मूर्ती तसेच प्रतिमांचा ऐतिहासिक साधनांत उल्लेख येऊ लागतो. मौर्यकाळातही म्हणजे नंदांनंतर १५० वर्ष पर्यंतही मूर्तीपूजा प्रचलित होती मात्र कोणत्याही साधनांत मंदिरांचा उल्लेख मात्र येत नाही.
साधारण इ.स.पूर्व ११० दरम्यान नारायण वाटक ( म्हणजेच मंदिर ) बनवल्याचा उल्लेख एका अभिलेखात येतो. तसेच मध्य प्रदेशातील विदिशा नगरी जवळ उत्खननात इ.स.पूर्व ११३ मध्ये हेलिओडोरस या स्वतःला भागवत म्हणवणाऱ्या ग्रीक राजदूताने बनवलेल्या गरुडध्वज खांबाजवळच एका चापाकृती मंदिराचे अवशेष मिळाले. ह्या सुरवातीच्या काळात मंदिर डोलमेन प्रकारचे असायचे. म्हणजे तीन उभ्या फरश्या आणि वरून आडवी एक फरशी छतासारखी टाकून एक लहानशी पडवी बनवली जात असावी.
![]() |
| डोलमेन |
आज ज्या वास्तूला आपण मंदिर म्हणून ओळखतो तश्या प्रकारच्या मंदिर वास्तूच्या बांधणीची खरी सुरवात गुप्त काळापासून होते म्हणजे साधारण इ.स. ५००-६०० दरम्यान. याच काळातील एक मंदिर मध्य प्रदेशात बघायला मिळतं, तीगाव मधलं किकली देवीचं मंदिर हे अगदी गुप्तकाळातील मंदिर शैलीचं उदाहरण आहे. हे मंदिर निराधार मंदिर आहे. आता हे काय असतं ? तर मंदिर आहे म्हटल्यावर प्रदक्षिणा मार्ग तर हवाच ना… जर प्रदक्षिणा मार्ग मंदिराच्या बाहेरून असेल तर ते मंदिर निराधार मंदिर म्हणवले जाते, पण जर मार्ग मंदिराच्या आतमध्येच असेल आणि वरून छताने आच्छादलेला असेल तर ते सांधार मंदिर असते.
![]() |
| कंकली देवी मंदिर, तीगाव, मध्य प्रदेश |
सुरवातीच्या काळात मंदिर वास्तू अगदीच गरजेपुरती होती. देवाला ठेवायला गाभारा हवा मग बांधली दगडाची छोटीशी चौकोनी खोली, देवासमोर बसायला छत हवं मग एक छोटासा मंडप बांधून टाकला दगडाचा, बस अजून काय पाहिजे, शिखर नको, ओटा नको, कलाकुसरयुक्त स्तंभ नको. हा या मंदिरात फक्त गाभाऱ्याच्या द्वारपट्टीवर थोडी कलाकुसर केलेली दिसते पण ती ही थोडीशीच. सुरवातीची मंदिरे अशीच, पण त्या मंदिर स्थापतींचे मन भरत नव्हते. हळू हळू मंदिरे फक्त देवाच्या पूजेची जागा ना राहता ग्रामातील एक सामाजिक स्थळ बनू लागले. त्याच सोबत मंदिरांनी कात टाकायला सुरवात केली आणि इ.स. १००० पासून ते इ.स. १४०० पर्यंत मंदिर वास्तुकलेची उच्चतम पातळी गाठली गेली. गुप्त, मगध, चंदेल, सोळंकी, गंग, राष्ट्रकूट, शिलाहार, चालुक्य, होयसाळ, पल्लव, चोल, विजयनगर या आणि अश्या अनेक राजवटींनी मंदिर बांधणीला चालना दिली आणि या कलेचा उत्तरोत्तर विकास केला.
आता आपल्या मूळ विषयाला हात घालू तो म्हणजे ही मंदिरं कशी बघावी, त्यांत काय बघावं आणि कसं ओळखावं आणि या मंदिरांचे प्रकार कोण कोणते असतात. लिहिण्याच्या सोयीसाठी लेखाचे दोन भाग करूया, १.मंदिराचे भाग , २.मंदिरांचे प्रकार.
भाग एक ** मंदिराची अंगे किंवा भाग **
![]() |
| नागर मंदिर बाह्यांगे |
अधिष्ठान :- मंदिर ज्या ओट्यावर उभे असते त्याला अधिष्ठान, पीठ किंवा जगती म्हणतात. मंदिरांचे अधिष्ठान हे चौकोनी, आयताकृती, वर्तुळाकार, लंबवर्तुळाकार किंवा अष्टकोनी असते. अधिष्ठानाचे महत्व फार असते. एक तर मंदिर त्यामुळे जमिनीपासून उंचावर दिसते, पावसाच्या पाण्यापासून बचाव होतो, प्रदक्षिणा मार्गासाठी जागा मिळते, तसेच हत्ती, घोडे वगैरेंचा शिल्पपट कोरून मंदिराची सुंदरता अजून वाढवता येते.
मंडोवर :- मंदिराची बाह्यभिंत. गाभारा तसेच बाहेरील विविध मंडप यांच्या बाह्य भिंतीला मंडोवर किंवा मसूरक म्हणतात. या भिंती इतक्या मजबूत असतात कि त्या प्रचंड मोठ्या छताला आधार देऊ शकतील त्याच सोबत त्या इतक्या अलंकृत असू शकतात कि पाहणाऱ्याला भिंतीचा मूळ उद्देश छताला आधार देण्याचा आहे हेच विसरायला होईल. या भिंतींवर देव दैवतांची अनेक रूपांतील शिल्पे तसेच मानवाकृती शिल्पांच्या पट्टीका असतात, त्यांना जंघा म्हणतात. या जंघांवर मंदिराच्या मूळ देवतेची रूपे तसेच देवतेच्या परिवारातील इतर देवतांची शिल्पे, विचिध विभ्रमांतील नर तसेच स्त्री प्रतिमा असतात. काही मंदिरांच्या मंडोवरावर इतक्या मूर्ती असतात कि भिंतीचा इंचभरचा भागही दिसत नाही. एक जंघा पट्टीका कमी पडते कि काय म्हणून काही मंदिरांचे स्थपती दोन किंवा तीन तीनही जंघा मंडोवरावर वसवतात. जसे अंबरनाथच्या मंदिराचे मंडोवर हे एकजंघा मंडोवर आहे कारण मंदिरावर एकाच जंघा पट्टीका आहे, मात्र खिद्रापूरच्या मंदिरात तसेच औंढा नागनाथ मंदिरात द्विजंघा मंडोवर आढळते आणि मार्कंडी येथील मार्कंडेश्वर मंदिरात तसेच खजुराहोच्या मंदिरांचे मंडोवर तर त्रिजंघा युक्त आहेत.
वेदिबंध :- अधिष्ठान आणि मंडोवरच्या मधील भागाला वेदिबंध म्हणतात. हे वेदिबंध अनेक आडव्या थरांनी बनलेले असते जसे सर्वांत खाली तळात खूर, कीर्तिमुखथर, गजथर, अश्वथर, पुष्पथर इत्यादी.
सुरसुंदरी:- मंदिराच्या बाह्य तसेच आतल्या भितींवर तसेच खांबांवर विविध विभ्रमांतील स्त्री प्रतिमा असतात. असतात त्या अगदी अप्सराच पण त्यांना सुरसुंदरी म्हणतात. शिल्पशास्त्रात १६ तर क्षीरवर्णात बत्तीस सुरसुंदरींचे वर्णन आलेले आहे. त्यापैकी काही सुरसुंदरी अश्या;
१. दर्पणा :- आरशात स्वतःला पाहणारी, भक्तांनी मंदिरात शिरण्यापूर्वी आपल्या अंतर्मनात पाहून असलेले सगळे विकार काढून टाकले पाहिजेत असे सांगणारी.
२. पुत्रवल्लभा :- देव भक्तांचे अगदी स्वतःच्या बाळाप्रमाणेच लाड करतो हे सांगणारी
३. शुभ गामिनी :- पायात रुतलेला काटा काढत असतांना. भक्तीच्या मार्गात येणारे अनेक अडथळे खऱ्या भक्ताने असेच दूर करून भक्तीच्या मार्गावर चालत राहावे हे सांगणारी.
४. शत्रू मर्दिनी :- हिच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात शत्रूचे मुंडके असते.
५. शुकसारिका :- एका हातावर शुक म्हणजेच पोपट बसवून दुसऱ्या हाताने त्याला खाऊ घालतांना हिला शिल्पित केले जाते. देव आपल्या भक्तांच्या पोटाचा प्रश्न स्वतःच सोडवतो हे सांगणायचा प्रयत्न असेल का हीचा ?
६. डालमालिका / शालभंजिका :- झाडाची डहाळी / फांदी धरून उभी असलेली.
७. पत्रलेखिका :- अतिशय सुंदरपणे आपले विभ्रम दाखवत उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनी मध्ये बोरू धरून कागदावर पत्र लिहीत असते.
८. स्त्री आणि माकड :- पूर्णपणे सालंकृत होऊन घराबाहेर पडलेल्या ह्या सुंदरीच्या एक किंवा दोहोबाजूने माकडे तिचा कधी मेखला ओढत तर कधी पदर खेचत छळ करत असतात आणि सुंदरीही हाताच्या फटकाऱ्याने त्यांना दूर करण्याच्या आवेशात असते.
९. नर्तकी :- नृत्य मुद्रेतली सुंदरी
१०. मर्दला :- ढोलकी वाजवत असलेली सुंदरी
या आणि अश्या अनेक स्वरूपातील शिल्पे मंदिराचे बाह्यांग आणि अंतरंग सजवत असतात.
![]() |
| सुरसुंदरी |
गर्भगृह आणि त्याचे प्रवेशद्वार :- वरती म्हटल्याप्रमाणेच मंदिरांचे निर्माणच मुळी देवतेच्या स्थापनेसाठी झाले, त्यामुळे, सर्वात आधीच्या मंदिरापासून ते आजच्या मंदिरांपर्यंत सगळ्याच मंदिरांत जी एक सामायिक गोष्ट सापडते ती म्हणजे गाभारा किंवा गर्भगृह. तेव्हापासून आतापर्यंत आणि कोणत्याही प्रकारच्या मंदिरात गाभारा असतोही लहानसाच. मंदिराचे स्थपती सहाव्या शतकातल्या मंदिरांतही गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराला सालंकृत करत होते. जसा जसा काळ पुढे सरकत गेला गर्भगृहाच्या द्वारपट्टीका अजून अजून सुंदर बनत गेल्या. नीट निरीक्षण केल्यास गाभाऱ्याच्या दरवाजात लहान लहान द्वारशाखा बनवून त्यावर फुले पाने, व्याल, गज, स्तंभ, गंधर्व तसेच मिथुन शिल्पे कोरलेली आढळतात. काही मंदिरामध्ये तर या द्वारशाखेचे नऊ नऊ थरही आहेत. तसेच या द्वारशाखांच्या तळाशी दोन्ही बाजूला द्वारपाल आणि गंगा तसेच यमुना यांची शिल्पे असतात. गर्भगृह प्रवेशद्वाराच्यावरच्या पट्टिकेला ललाटपट्टी आणि त्याच्या मध्यभागाला ललाटबिंदू म्हणतात. या ललाटबिंदूंमधे मंदिराच्या मुख्य देवतेचे शिल्प असते मात्र ११व्या शतकानंतर ललाटबिंदूंमधे गणेशाला स्थान मिळाले मग मंदिर कोणत्याही देवतेचे असले तरीही.
गर्भगृह प्रवेशद्वार
अंतराळ :- गाभारा आणि मंडप यांना जोडणारे दालन म्हणजे अंतराळ . हा लहानगाच भाग असतो
आणि पूर्णपणे उघडा म्हणजे ना छत ना भिंती असा असू शकतो (जसा सुरवातीच्या काही मंदिरांत
आढळतो) किंवा पूर्णपणे बंदिस्त असतो. अंतराळात साधारणपणे मंदिराच्या मुख्यदेवतेची किंवा
परिवारातील इतर देवतांची शिल्प किंवा मूर्ती देवकोष्ठकांत असतात. काही मंदिरांत मात्र
अंतराळ पूर्णपणे रिकामे असते.
मकरप्रणाल :- मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या मूर्तीवर पाण्याच्या आणि दुधादि द्रव्यांचा
अभिषेक केला जातो, या पाण्याचा निचरा करण्यासाठी गाभाऱ्यातून एका वारिमार्गाची योजना केलेली असते. या वारिमार्गाचे
मुख गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूने असते. बाहेरच्या बाजूने मार्गाच्या तोंडाशी मगरीचे
मुख किंवा गाईचे मुख असते. प्राचीन काळातल्या मंदिरांमध्ये आपल्याला येथे मकरमुख (मगरीचे
मुख) दिसते कारण हे बाहेर येणारं अभिषेकाच पाणी तीर्थ म्हणून प्राशन केलं जातं आणि मगर म्हणजे गंगेचं वाहन. त्यामुळे
तिथून पडणारे ते गंगाजल. मराठेकालीन मंदिरांमध्ये मात्र मगरीचे महत्व कमी झाले आणि
तिथे गोमुख दिसू लागले कारण गायही पवित्र मानली जाते.
संगमेश्वर जवळील कर्णेश्वर मंदिर
| मकर तोरण |
मंडप :- ज्या कारणांसाठी आधुनिक काळात मानव मंडप बांधतो त्याच कारणांसाठी मंदिरांतही मंडपाची योजना केलेली असते, काही काळ सानिध्यात बसण्यासाठी, मंदिरात अर्थातच देवाच्या सानिध्यासाठी, मंदिरात होणाऱ्या नृत्य, गायन, भजन, प्रवचनादी कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी. मंदिर कोणत्याही प्रकारचं असलं तरीही मंडप हा असतोच. नागर शैली मंदिरांमध्ये लहानच पण २ ते ३ एका मागे एक असे मंडप असू शकतात. द्राविड शैली मंदिरांत मात्र साधारणपणे एकच आणि मोठासा मंडप असतो. मंडपही दोन प्रकारचे असतात, जर मंडपाच्या दोन्ही बाजूंना भिंती नसतील किंवा फक्त कठडे असतील म्हणजेच भिंती पूर्णपणे खालपासून वरपर्यंत जाणाऱ्या नसतील तर अश्या मंडपाला रंगमंडप म्हणतात. या रंगमंडपात मध्यभागी होत असणाऱ्या नृत्य, भजन, प्रवचन वगैरे सारख्या देवाच्या सेवेला पाहण्यासाठी भक्तांना येथे संधी असते. पण जर मंडप बंदिस्त असेल तर त्याला गुढमंडप म्हणतात. जसा माणकेश्वर मंदिराचा आहे.
भाग दोन : ** मंदिरांचे प्रमुख प्रकार आणि त्यांना
ओळखण्याच्या खुणा **
भारतात मंदिर बांधणीत साधारणपणे २ मुख्य प्रकार आहेत;
A.
उत्तर भारतातील नागर शैली
B.
दक्षिण भारतातील द्राविड शैली
याशिवाय ११ ते १३ व्या शतकांत प्रचलित असलेल्या अजूनही काही उपशैली प्रामुख्याने आढळतात;
C.
मध्य भारतातील वेसर शैली
D.
भूमिज मंदिर शैली
E.
फांसणा शिखर शैली
वरीलपैकी भूमिज शैली ही नागर शैलीचेच एक रूप आहे तर वेसर ही नागर आणि द्राविड शैलीचे मिश्रण आहे. फांसणा ही वेगळी मंदिर शैली असण्यापेक्षा वेगळी शिखर शैली आहे असे म्हटले पाहिजे. या मंदिर शैलींबद्दल अभ्यासताना अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातील भूगोलाचा, वेगवेगळ्या राजघराण्यांचा भरपूर प्रभाव मंदिरांच्या बांधणीवर झालेला दिसतो. जसा संगीतामध्ये सूर सगळे तेच असतांना सुद्धा गायकीची वेगवेगळी घराणी असतात तसंच येथेही आहे. त्यामुळे गुजराथेतली मंदिरं आणि ओडिशा मधली मंदिरं सगळी नागरचं, पण मंदिरांमधलं वेगळेपण दिसून येत. मंदिरांचे प्रकार ओळखण्यासाठी साधारणपणे त्या मंदीरांची शिखरे बघितली जातात. मंदिर शिखरांत असलेल्या वैविध्यावरून त्या मंदिराचा प्रकार ठरवलं जातो.
सर्वप्रथम आपण दोन मुख्य शैली समजून घेऊ नागर आणि द्राविड.
उत्तर भारतीय नागर मंदिर शैली शिखर
ह्या शैलीची मंदिरे पंजाब पासून ते बंगाल पर्यंत तसेच काश्मीर आणि नेपाळ पासून ते विंध्याचल पर्यंतच्या परिसरात आढळतात. नागर शैलीच्या मंदिरांचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे आमलक. मंदिराच्या मुख्य शिखराच्या कळसाखाली चपट्या आवळ्यासारखं असतं ते.
नागर शैलीचे अजून एक लक्षण म्हणजे मंदिरावर छताची थोडीशीही जागा शिल्लक न ठेवता बनवलेली एका पेक्षा अधिक शिखरे. मंदिराच्या अंतरंगातील गाभारा, अंतराळ तसेच विविध मंडप या सर्वांच्या वरून छतावर वेगवेगळ्या शिखरांची योजना केलेली असते. गर्भगृहापासून ते मंदिर वास्तू प्रवेशद्वारापर्यंत हि सर्व शिखरे उंचीत उतरत्या क्रमाने असतात. गाभाऱ्यावर असते ते शिखर किंवा रेखाशिखर त्यानंतर महामंडप शिखर, मंडप / भोगमंडप शिखर, अर्धमंडप शिखर अश्या प्रकारे लहान लहान होत जाणारी शिखरे असतात. शिखरांची संख्या मात्र कमी अधिक असू शकते.
गर्भगृहाच्या छातीवरचे शिखर खालून चौकोनी असते आणि वरच्या दिशेने निमुळते होत जाते. याच्या चारही दिशांनी मध्यभागी पूर्ण आमलकापासून ते शिखराच्या तळापर्यंत एक कलाकुसरयुक्त पट्टी असते तिला मूलमंजिरी किंवा रहपग किंवा लॅटिन म्हणतात. मूलमंजिरीच्या दोन्ही बाजूंना हिच्या पेक्षा कमी उठावदार नक्षिदार पट्ट्या असतात त्यांना रथ म्हणतात.
अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रेखाशिखराच्या चारही बाजूच्या अंगावर मूळ शिखरावर लहान उंचीचे शिखर असते त्याला उरुशृंग म्हणतात. ह्या उरुशृंगावर अजून एक अजून लहान उंचीचे शिखर असते त्याला प्रत्यंग म्हणतात. ह्या प्रकारचे शिखर आपल्याला भीमाशंकर मंदिर तसेच राजस्थान आणि गुजराथेतील मंदिरांवर सहजपणे बघता येते.
दक्षिण भारतीय द्राविड शैली मंदिर शिखर
द्राविड शैलीची मंदिरे ही पिरॅमिड प्रमाणे खालून वर लहान लहान होत जाणाऱ्या पायऱ्यांची असतात. प्रत्येक पायरीला भूमी म्हटले जाते. प्रत्येक पायरीच्या म्हणजेच भूमीच्या कोपऱ्यांवर देवळाची लहान प्रतिकृती असते त्याला कूट म्हणतात. तसेच मध्यभागी गजपृष्ठाकृती छताचे लहान देऊळ असते त्याला शाल म्हणतात. (गजपृष्ठाकृती म्हणजे हत्तीला मागून बघत असल्याचा विचार करा त्याची पाठ आपल्याला जशी गोलाईमध्ये दोन्ही बाजूला उतरती दिसते तसेच छत बनवले जाते).
द्राविड शैली मंदिराचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे शिखरावरील कलशाखाली असलेली स्तूपीका. हि स्तूपीका चौकोनी, षटकोनी किंवा अष्टकोनी असते. द्राविड मंदिरांत मंडपावरील छत मात्र पूर्ण सपाट असते, नागर मंदिरांप्रमाणे अधिकची शिखरे बनवली जात नाहीत आणि त्यामुळेच या मंदिरांचे मंडप नागर मंदीरांपेक्षा फार मोठ्या आकाराचे असतात. वेरूळच्या लेण्यांतले कैलास मंदिर हे द्राविड शैलीतले आहे.
फांसणा शिखर
फांसणा हि मंदिर शैली असण्यापेक्षा फक्त एक शिखर पद्धती आहे. नागर तसेच द्राविड दोन्हीप्रकारच्या मंदिरांमध्ये हि शिखरे आढळतात. साधारण लहान मंदिरांचे शिखर अश्या प्रकारचे असते. हि शिखरे उतरत्या पायऱ्यांसारखी असतात. पिरॅमिड प्रमाणेच खालून वर निमुळत्या होत जाणारी आणि लहान लहान होणाऱ्या पायऱ्यांची, मात्र या पायऱ्यांवर कूट किंवा शाल दिसत नाहीत. अश्या प्रकारचे शिखर आपल्याला महाबळेश्वराच्या मंदिरावर दिसते. काही ठिकाणी मंदिराचे मुख्य शिखर सोडून बाकी मंडप शिखरे या प्रकारची असतात जसे कि अंबरनाथच्या महादेव मंदिरात दिसते. या शिखराच्या कलाशाखाली जर आमलक असले तर ते मंदिर नागर समजावे आणि जर स्तूपीका असेल तर द्रावीड.
मध्य भारतातील भूमिज मंदिर शैली शिखर
महाराष्ट्रात भरपूर संख्येत आढळणारी मंदिरे हि भूमिज प्रकारची आहेत. वर म्हटल्या प्रमाणे भूमिज ही नागर शैलीची उपशैली आहे. त्यामुळे रेखशिखर, मंडप शिखर, अर्धमंडप शिखर वगैरे सर्व असतात ह्या मंदिरांच्या छतावरही मात्र
वेसर मंदिर शैली शिखर
![]() |
| वेसर शैली मंदिर शिखर |
वेसर मंदिर शैली म्हणजे उत्तर भारतीय नागर आणि दक्षिण भारतीय द्राविड शैलीचा सुरेख संगम आहे. नागरशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे उंच आणि अतिशय सुंदर दिसणारे रेखाशिखर म्हणजेच गर्भगृहाच्या छतावरचे शिखर पण या मंदिरांची अडचण एकच ती म्हणजे लहानसा मंडप. नागर मंदिरांचा मंडप लहान का असतो याचा उहापोह वरती आधीच केलेला आहे. प्राचीन काळी मंदिरे हि सामाजिक केंद्रे होती राजाला किंवा गावाला कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजनांसाठी मंदिरेच उपयुक्त वाटत, पण मग आता मंडप लहान असल्यावर तिथे आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनावर, सहभाग नोंदवणाऱ्या लोकांच्या संख्येवर विपरीत परिणाम होइ. आता याचा इलाज काय करावा तर या मंदिरांच्या स्थपतींनी त्यासाठी दक्षिण भारतातील मंदिरांकडे पाहिले. द्राविड शैलीच्या मंदिराचा मंडप आकाराने फार मोठा असतो किंवा मंदिर बांधणाऱ्याला गरज वाटल्यास कमी अडचणीत मोठा मंडप सहज बांधला जाऊ शकतो. मध्य भारतातील मंदिर स्थपती नागर आणि भूमीज मंदिर शिखरांच्या प्रेमात होते त्यांनी मंदिरांच्या गर्भगृह छतांवर उंचच उंच नागर आणि भूमिज शिखरे उभी केली मात्र मंडपाची छते दक्षिणेकडील पद्धतीसारखी सपाट बनवायला सुरवात केली. हीच उत्तर आणि दक्षिण संगम शैली वेसर शैली म्हणवते. महाराष्ट्रात तसेच जास्त करून कर्नाटकात वेसर शैलीची मंदिरे आढळतात. चालुक्य आणि होयसळ राज्यकर्त्यांनी वेसर शैलीचा भरपूर वापर केला. बदामी आणि हंपी ची मंदिरे, बेलूर तसेच हळेबिडूची मंदिरे वेसर शैलीची आहेत.
हेमाडपंथी मंदिरांचं गुपित
यादवांच्या काळात १३व्या शतकात हेमाडपंत किंवा हेमाद्री पंडित हा प्रधानमंत्री होता. यादवराजे हे शंकराचे निस्सीम भक्त असल्या कारणाने त्यांच्या आज्ञेने हेमाडपंताने संपूर्ण यादव साम्राज्यात शिव मंदिरे बांधविली. हेमाड स्वतः अनेक शास्त्रांत निपुण होता त्याने त्याकाळी महाराष्ट्रात प्रसिद्ध पावलेल्या नागर आणि भूमिज शैलींचा वापर मंदिरे बांधण्यासाठी केला, मात्र त्याने बांधकामाची स्वतःची वेगळी शैली विकसित केली होती. सामान्यतः इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्याप्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून, त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना केली जाते. मंदिरांसारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत ही दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना एकसंध उभी राहाते आणि टिकाऊही बनते.
आपल्याकडे प्राचीन दिसणारे कोणतेही मंदिर हेमाडपंथी मंदिर म्हटले जाते, पण हे चुकीचे आहे हेमाद्री पंडितांच्या शेकडो वर्ष आधीही महाराष्ट्रात उत्कृष्ट प्रकारची मंदिरे बनवली जात होती. हेमाडपंती स्थापत्यशैली मध्ये बनवलेली बरीच मंदिरे महाराष्ट्रात आहेत. जसे की रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, औंढा नागनाथमंदिर, इत्यादी.
मंदिरांचे अंतरंग आणि बाह्यांग यांची थोडीफार माहिती घेतल्यानंतर महाराष्ट्रातल्या अश्या मंदिरांची यादी बनवूया जी पहिलीच पाहिजेत, हि मंदिरे आपल्या सुंदरतेने, वास्तुशास्त्राने, शिल्पकलेने आपले एक विशिष्ट स्थान कमावून बसलेली आहेत.
१. अंबरनाथचे महादेव मंदिर
२. कोप्पेश्वर मंदिर, खिद्रापूर
३. महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर
४. अन्वा शिवमंदिर, सिल्लोड, औरंगाबाद
५. निळकंठेश्वर मंदिर, निलंगा, लातूर
६. श्रीविठ्ठल मंदिर, पानगाव, लातूर
७. धर्मपुरीचे केदारनाथ मंदिर, पानगाव पासून ३० कि.मी., लातूर
८. ताकाहारी मंदिर, नगर
९. औंढानागनाथ मंदिर, हिंगोली
१०. सिद्धेश्वर मंदिर, होट्टल, नांदेड
११. मार्कंडेश्वर मंदिर, मार्कंडी, गडचिरोली
१२. दैत्यसुदन मंदिर, लोणार
१३. गोंदेश्वर पंचायतन मंदिर, सिन्नर, नाशिक
·
धवल स. भंगाळे, पाऊल ट्रेकर्स, डोंबिवली.
माहिती आणि काही छायाचित्र साभार आंतरजाल.
2.
Google.com Images
3.
BOOK: मंदिर कसे पाहावे -- गो. बं. देगलूरकर

















